1 जुलै कृषी दिन विशेष लेख! आधुनिक भारताचा कृषी संत-वसंतराव नाईक साहेब !

१ जुलै हा भूमिपुत्र महानायक वसंतराव नाईक साहेबांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
नाईक साहेबांचे जीवन शेती, शेती आणि शेती याशिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही मंत्रालयात बसून शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवाल? त्यावेळेस नाईक साहेबांनी फार सुंदर उत्तर दिले होते, मी जरी मंत्रालयात बसलो असेल तरी माझे मन शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. यावरून शेतकऱ्या प्रती त्यांना प्रचंड जिव्हाळा होता. नापिकी सतत होणारे दुष्काळ त्यामुळे शेतकरी हवालदार झाला परंतु आपल्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला आहे असा आत्मविश्वास असल्यामुळे त्यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. हरित क्रांतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्याला मुख्य विकासाच्या वाटेवर नाईक साहेबांनी आणले. “शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे” ,कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर, रोजगार हमी योजना अशा अनेक क्रांतिकारी योजना राबवून त्यांनी शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले. शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यासाठी त्यांनी एकाधिकार कापूस योजना आणली. शेतकरी हा त्यांचा जीव की प्राण होता. त्यांच्या दौऱ्यामध्ये शेतकरी दिसला की हमखास त्यांची गाडी थांबायची. ते शेतकऱ्याची हितगुज करायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. म्हणून त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्या नाही. परंतु नाईक साहेबांच्या नंतर शेतकऱ्याची दुर्दशा झाली आणि आज हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणून शेतकरी आज संपूर्ण कर्जमाफी साठी सरकारच्या घोषणेची वाट बघतो आहे. त्यामुळे नाईक साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.कारण नाईकसाहेबांचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्याचा असायचा.
पहिला पाऊस मुंबईला पडला की, नाईकसाहेब वर्षा बंगल्यावर पेढे वाटायचे आणि पाऊसाचे स्वागत करायचे, मी जरी मुंबईत असलो तरी माझे संपूर्ण मन शेतकऱ्याच्या बांधावर आहे, असे ते आत्मविश्वासाने सांगायचे. प्रत्येक शेतकऱ्याला आपला कुटुंबातला माणूस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान आहे. असे सतत वाटायचे म्हणून तीन तीन दिवस उपाशी राहणारा शेतकरी कधी कधी मिलो ज्वारी वर गुजरान करणारा हा बळीराजा आत्महत्या करायचा नाही. परंतु का कुणास ठाऊक ? आता दररोज कोणी ना कोणी शेतकरी विषाचा डब्बा घेतो किंवा विहीर जवळ करतो. हे सर्व थांबवायचे असेल तर नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपण पुसद मध्ये वकिली करत असताना एकटेच संध्याकाळी दोन चार खेडे जसे भोजला ,पारडी, वालतुर, सांवगी येथे जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवित होते. लोकांना कायद्याची जाणीव करून देत होते. परंतु आज बहुजन समाजात प्रचंड प्रमाणात वकील ,डॉक्टर, प्राध्यापक आहेत परंतु आज तुमच्यासारखे कोणीही खेड्यात जाऊन बहुजनाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत नाही. बंगला, माडी, साडी आणि गाडीतच ही मंडळी जाम खुष आहे. त्यामुळे “पे बॅक टू सोसायटी” करण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
पोफळी साखर कारखाना उद्घाटन प्रसंगी आपण “शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे” अशी सिंहगर्जना केली होती. आपण हयात असताना पोफाळी कारखाना नफयात तर बळीराजा सुखात होता. परंतु आता तो आणि अनेक साखर कारखाने बंद होण्याच्या स्थितीकडे वाटचाल करत आहे. तुम्ही निर्माण केलेल्या अनेक सूतगिरण्या बंद पडलेल्या आहे. त्यातील हजारो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. त्यामुळे कारखाना व सूत गिरणी सुरु ठेवण्याकरिता व शेतकरी हा कारखानदार करण्याकरिता नाईक साहेब तुम्ही जरूर परत या!
सौ. वत्सलाबाई नाईक यांनी एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे की, मी नाईकसाहेब यांना पूजा-अर्चा करताना कधी बघीतलेच नाही. ते पूजा करायचे माणसाची आणि माणूस हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता. परंतु नाईकसाहेब तमाम बहुजन आज पूजा-अर्चा, होम-हवन, सत्यनारायण पूजा, कर्मकांड व संकट-चतुर्थी, पौर्णिमा, एकादशी,अमावस्या या व अशा अनेक धार्मिक कर्मकांडामध्ये गुंतलेले आहे. आपण तर कधी पूजा केली नाहीच परंतु संत सेवालाल महाराजांनी सुद्धा “भजो मत पुजो मत” चा नारा दिला. आपला हा बहुजन बांधव पूजा-अर्चा , होम-हवनात फार मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा खर्च करताना दिसतो आहे. जेवढा मोठा अधिकारी तेवढा तो पोथीवाचक , नोकरीत जास्तीचे मिळालेले पैसे तो समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना देणार नाही. परंतु शेगाव, शिर्डी , शनिशिंगणापूर येथे जाऊन अमाप देणगी देणार! पोहरादेवी येथे जाऊन नतमस्तक होण्यासाठी त्याला लाज वाटणार!, पण मुंबईत एका व्हीआयपी मंदिरात तासनतास ताटकळत दर्शन घेणार, आपण कधीही पंचांग पाहिला नाही. हे मी ठामपणे या ठिकाणी नमूद करु इच्छितो. परंतु हा बहुजन बांधव पंचाग, मंगळ, जोतिष-बाढ, भविष्य पाहिल्याशिवाय लग्न करीत नाही. केवढी मोठी ही शोकांतिका ? दुसरे असे की चार पुस्तक शिकलेल्या आमच्या भगिनी शहरात आल्याबरोबर मार्गशीष महिना ,नवरात्र, संकट चतुर्थी ,वैभव लक्ष्मी व्रताकडे वळलेल्या आहेत. आठवड्यातले चार चार दिवस उपास-तापास करून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. नाईकसाहेब आपल्या पूर्ण हयाती मध्ये कोठेही मंदिराचे बांधकाम आपण केले नाही केले नाही. परंतु आज तांडया तांड्यात मंदिर बांधकामाचे फार मोठे लोन पसरले आहे .या अनिष्ट रूढी परंपराच्या मागे लागून समाज स्वतःची ओळख विसरत आहे. गौरवशाली गौर संस्कृती आणि गोरधाटी विनासाच्या वाटेवर आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही अनेक प्रयास करत आहो.! परंतु नाईकसाहेब आमचे कोणीही मनावर घेत नाही. या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपण लग्नात हुंडा घेतला नाही. परंतु कमी खर्चात एक आदर्श लग्न केलं असे समाजात बुजुर्ग मंडळी आजही सांगतात. परंतु नाईकसाहेब आज लग्नाच्या बाजारात सर्वांचे रेट ठरलेले आहे. पोलीस , ग्रामसेवक, पटवारी, बाबू ५ लाख, प्राध्यापक ,इंजिनीयर १५ लाख ,डॉक्टर ३० लाख व त्यापुढेही एवढेच नाही तर मग म्हैस चारणार सुद्धा साठ-सत्तर हजार घेतो. इतर सोना चांदी आणि सामान वेगळे द्यावे लागते “देजो देणारा” हा समाज हुंड्यापायी आपल्या मुलाला चक्क बैलासारखा विकतो आहे .आणि समाजातील एका घराला नेस्तनाबूत करण्याचा हा जुगार खेळतो. यासाठी समाजात कोणीही पुढे यायला तयार नाही *हुंडा शिवाय लग्न करणारी मंडळी प्रा. प्रभंजन चव्हाण पुणे ,भारत पवार मुंबई, डॉ. पवन राजूदास जाधव आर्णी व अशी अनेक मंडळी समाजात आहे. पण त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी होत नाही. ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आहेत ते नाईकसाहेब समाजाला फटकून वागतात. मी आणि माझा सासरा… बस बोटी आणि सळोई ? यामध्ये मशगुल आहेत. यामुळे हुंडा न देऊ शकणाऱ्या कुटुंबातील आजही अनेक मुली नाईलाजास्तव मारवाडी समाजात विवाह करत आहे, आणि गरीब घरातल्या मुली खानदेश विभागात पैसा घेऊन विकल्या जात आहेत. काही लालची हुंडाबहादरांनी अनेक मुली जाळून टाकलेल्या आहेत. हे भीषण वास्तव्य थांबवायचे असेल तर नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपण पुणे येथील शनिवार वाडयासमोर भाषणात सांगितले होते की, मी महाराष्ट्र दोन वर्षांत अन्न धान्याने स्वंय पुर्ण केला नाही तर मला फाशी द्या किती मोठी ही भीष्मप्रतिज्ञा. तरीही आपण हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करून दाखविला. शेती ही निसर्गाच्या पाण्यावर पिकत नसून स्वतःच्या घामाने पिकते. उत्तम शेती करायची असेल तर माणसाने शेतीत गाडुन घेतले पाहिजे! परंतु नाईकसाहेब स्वतःच्या घामाने शेती पिकवण्याचे सोडून आज बहुजन बांधव ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या राजकारणात एवढा अखंड बुडाला आहे की, त्याला शेतात कोणती पिके घ्यायची याची सुद्धा जाणीव राहिलेली नाही. काही शेतकरी तुमच्या शब्दाला जागून फार मोठी प्रगती करताना दिसत आहे. परंतु टक्केवारीत ते अल्प आहेत. शासनाकडून काही मिळते का ? यासाठीच पंचायत समितीमध्ये दिवसेंदिवस चकरा मारणारे अनेक रिकामटेकडे मंडळी दिसून येते. सकाळी उठून शेतात जाण्यापेक्षा त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे महत्त्वाचे वाटते. तुम्ही निर्माण केलेले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, मृदसंधारण खाते हे शेतकऱ्यांच्या वरवर मलमपट्टी करतात. परंतु कोणतेही चांगले उपक्रम राबविताना दिसत नाही. बँका उद्योगधंद्यासाठी पतपुरवठा करीत नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल व कर्जबाजारी झाला आहे. शेताच्या बांधावर झाडे नाहीत ,गोठ्यात गुरे नाही ,ज्याला शेती विकून नोकरी लावली तो मुलगा परत कुटुंबाकडे लक्ष द्यायला तयार नाही. सासुरवाडीला जाण्यामध्ये धन्यता मानतो. अशा भीषण संकटात बळीराजा अडकला आहे. बळीराजाला जगवायचे असेल तर नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपल्या मुख्यमंत्री काळात महाराष्ट्रात बहुजनांच्या मुला-मुलीच्या सोयीसाठी ४७० आश्रम शाळा निर्माण केल्या. यामधून बहुजनाची शैक्षणिक फौज निर्माण व्हायला पाहिजे होती. असे आपले स्वप्न होते. परंतु त्या आश्रम शाळेचे काही संस्थापक अध्यक्ष बहुजनातील फौज निर्माण करण्याचे सोडून स्वतः गब्बर होण्यातच धन्यता मानली. आपण सर्वांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळद्धारे पी एन कॉलेज, वसतिगृह निर्माण करून विदर्भातील सर्व गोर गरीब मुलांना शिक्षणाची मोफत सोय करून दिली. त्यामुळे अनेक अधिकारी झाले परंतु त्यांनी आपल्या तांड्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आज मुलाला पहिल्या वर्गात टाकायचे असेल तर विस ते तिस हजार डोनेशन द्यावे लागते. वरून ट्यूशन फी वेगळीच कसा शिक्षण घेणार समाज? यांना धडा शिकवायचा असेल तर नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
३१ जानेवारी १९५३ साली मा. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे दिग्रस येथे प्रथम अधिवेशन घेऊन तमाम गोर बंजारा बांधवांना एकत्र करून नवी दिशा देण्याचे फार मोठे क्रांतीकारी काम आपण केले होते, आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून तमाम बंजारा बांधवांचे संघटन निर्माण करून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी क्रांतीकारी पाऊल उचललेले असताना नाईकसाहेब आज समाजात बंजारा क्रांती दल, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, गोरशिकवाडी, गोर सेना, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था, बंजारा परिवर्तन अभियान ,भारतीय भटके युथ फंट,राष्ट्रीय बंजारा मिशन, बंजारा सेना या व अशा अनेक जवळपास ८० ते ८५ संघटना निर्माण झाल्या असून कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही. यामध्ये व्हाट्सअप गँग वेगळीच धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे बंजारा बांधव संभ्रमित झालेला आहे. मा. रणजित नाईक ,मा. राजू नाईक मुंबई यांनी तमाम संघटना २००३ मध्ये एकत्र करून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाचे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु माजी खासदार मा. हरिभाऊ राठोड आणि इतर मंडळींनी प्रचंड विरोध केल्यामुळे सर्व संघटना एकत्र येऊ शकल्या नाहीत.सर्व संघटना एकत्र करण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपण शेवटच्या क्षणी सुद्धा सिंगापूर येथील हॉटेलमध्ये हातात लिंबुचे झाड असताना प्राण सोडले म्हणूनच मधू मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक आपल्याला हिरवा माणूस म्हणून संबोधायचे, किती मोठे झाडावरचे आपले प्रेम आज सरकार एक कोटी वृक्ष लागवडीचे, त्यानंतर तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविताना दिसत आहे. परंतु लोकांचा सहभाग हा नगण्य असतो. झाडावर प्रेम करण्या ऐवजी सर्व झाडांची कत्तल होताना दिसत आहे. त्यामुळे जंगले नष्ट होत आहे. झाडावर प्रेम करण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
पुसदच्या यशवंत रंग मंदिरात आपली सभा एकण्यासाठी त्यावेळी खेड्यापाड्यातून लोक घरच्या भाकरी घेऊन सभेसाठी पाच सहा कोस पायी चालत यायचे. सभेमध्ये गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे यावर आपण हमखास बोलायचे… काहीही करा, उपाशी रहा परंतु आपल्या मुलाबाळांना शिकवा. असे आपण पोटतिडकीने सांगायचे त्यामुळे गोरगरीब ,अशिक्षित लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटले आणि त्यांनी आपली मुले शिक्षणासाठी पुढे केली म्हणूनच आज गोर बंजारा समाजामध्ये प्रचंड प्रमाणात क्लासवन अधिकारी आहेत हे विसरून चालता येणार नाही. सभा संपल्यानंतर आपल्या भाषणामुळे आलेले हत्तीचे बळ घेऊन जलाराम हॉटेलमध्ये रस्याच्या आलुबोंडयावर ताव मारून रात्री पायी गावाकडे जायचे. आज तसे राहिलेले नाही. एखाद्या नेत्याची सभा घ्यायची असेल तर पैसे देऊन माणसं गोळा करावी लागतात. पैसे देऊनही सभेला गर्दी जमत नाही. लोकांना आता भाषण नको राशन पाहिजे ही अफाट गर्दी जमवण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
आपण मुख्यमंत्री असताना पुसद येथे सुरेश मेश्राम नावाचे S.D.O.होते त्यांच्याबाबत काही लोकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याने मेश्राम यांना बंगल्यावर बोलावून नियमाप्रमाणे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले व त्यांना काम करण्याची संधी दिली. आता तसे राहिलेले नाही. राजकीय द्वेषापोटी अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात येते. त्यांची रितसर बाजू ऐकून घेण्यात येत नाही. आणि कर्मचारी संघटना याकडे लक्ष देत नाही. या दुष्टचक्रातून अधिकारी वर्गांना वाचवण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
नाईकसाहेब आपल्या काळात एका नायकावर नसाबं-हसाबं करणारा तांडा आज राजकीय परिस्थितीमुळे चार चार नायकाच्या दहशतीखाली वावरत आहे. तांड्यात आता शाळकरी मंडळी कमी आणि माळकरी जास्त झाले आहे. ज्या तांड्यात जसे समनक,कर, ओरी,दसराव, गेर करायचे त्याच तांड्यात भागवत कथा, हरिपाठ सुरू आहे. तांड्यातील शाळा-अंगणवाड्यांच्या फरशी बसवण्याकरिता देणगी न देणारा बंजारा बांधव आज गणेश उत्सव, दुर्गादेवी उत्सव मध्ये दीड लाखाच्या डिजेवर थिरकतो आहे. त्यांचे मूलभूत प्रश्न मागे पडलेले असून अध्यात्मिक प्रश्न समोर आलेले आहेत. नवतरुण युवा पिढी खर्रा ,गुटखा बिअरच्या आहारी गेली आहे. शेतात काम करताना कोणी दिसत नाही आणि पत्ते खेळण्याकरिता पारावर गर्दी झालेली आहे. बहुतांश मंडळी व्यसनापायी बरबादीचा मार्गावर आहे. तांड्याला आता कोणी वाली राहिलेला नाही. आम्ही पोरके झालो आहोत. हे सर्व विदारक चित्र थांबण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
सन १९५३ मध्ये भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईच्या घरी बंजारा समाजाचे चालते बोलते विद्यापीठ पद्मश्री रामसिंगजी भानावत यांना पाठवून आपण परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भावनेच्या भरात तुम्ही माझ्यासोबत येऊ नका, प्रथम बंजारा समाजात एकमत करा असा संदेश दिला होता. त्या दृष्टीने आपण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना करून दिग्रस येथे ३१ जानेवारी १९५३ मध्ये प्रथम अधिवेशन बोलावले होते. आणि ३० जानेवारी १९५३ रोजी हा विषय कोर कमिटीत ठेवला. परंतु उत्तर प्रदेशचे प्रा. प्रीतमसिंह यांनी या परिवर्तनाच्या विषयावर प्रचंड विरोध केला. त्यामुळे उद्घाटक म्हणून आलेले देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली नाही. त्यामुळे आपण परिवर्तनाच्या दिशेने गेलो नाही. परंतु पद्मश्री रामसिंगजी भानावत, बाबूसिंग राठोड, लोकनेते बळीराम पाटील मांडवीकर, चंद्राम चव्हाण, सखाराम मुडे गुरुजी उमरखेड, माजी आमदार प्रतापसिंग आडे वसंतनगर या व अशा अनेक कार्यकर्त्याकडून आपण बंजारा समाजात परिवर्तन घडवून आणले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून ताठमानेने जगण्यासाठी ९ एप्रिल १९६५ रोजी तमाम भटक्या- विमुक्तांना साडेतीन टक्के आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच आज भटका- विमुक्त समाज सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करतो आहे . एवढेच नव्हे तर बंजारा समाजातील आजही सामान्य माणसांना सुद्धा इतर समाजातील मंडळी नाईक म्हणूनच संबोधल्या जाते. परंतु आज समाजात काम करणारे कार्यकर्ते फार कमी असून व्हाट्सअपवर रात्रंदिवस पोस्ट टाकणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुकाळ झाला आहे. व्हाट्सअप गँग ही सामाजिक काम करण्यासाठी गावात जाऊन प्रबोधन करणार नाही किंवा स्वतःच्या परिवारातील माणसाला मदत करणार नाही, परंतु व्हाट्सअपवर प्रचंड गोंधळ घालणार ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. तसेच तांडया तांड्यात छोट्या छोट्या कारणावरून प्रचंड हाणामारी, कोर्ट केसेस ,४९८ च्या केसेस करण्यात गावातीलच काही मंडळी गुंतलेली आहे. आजही लोक सांगतात की, आपण वकील असताना लोकांना कोर्टात केसेस करू नका, भांडण तंटे गावातच मिटवा असा संदेश वारंवार देत होता. परंतु आज बंजारा समाजातील विचारवंत मंडळी समाजाला समजावण्याचे काम करताना दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे.
आपल्या प्रथम निवडणुकी दौऱ्यामध्ये आपले पाय दुधाने धुऊन गावाच्या सीमेवर कुमकुम टिलकांनी स्वागत व्हायचे. त्यानंतर ज्याला जमेल तेवढे पैसे निवडणूकी करीता दान द्यायचे. बाया मंडळी आपल्या कानातील सोन्याचे डूल, चांदीचे कडे, नाकातील नथ व इतर दागिने स्वखुशीने निवडणुकीकरिता आपल्या पदरात टाकुन धन्य मानायच्या आता तसे राहिलेले नाही.सध्या निवडणूक काळात उमेदवाराची गाडी आली की, प्रचंड दगडफेक करायची त्यानंतर पैसा व दारू घेऊन मतदान करायचे एकाच पक्षाखाली मतदान करणारा तांडा आज अनेक पक्षांत विभागला गेला आहे. बाप काँग्रेसला, तर बायको दोनशे रुपयाच्या गॅस साठी भाजपाला, पोरगं शिवसेनेला आणि सुनबाई आम आदमी पार्टीला मतदान करताना दिसते. ही लोकशाहीची थट्टा व परिस्थिती सुधारण्यासाठी आणि तमाम गोर बंजारा समाजाला एका झेंड्याखाली आणण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
ज्या विधानभवनात आपण साडे अकरा वर्ष आदर्श मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. व विदर्भवीर भाऊ जाबुंवतराव धोटे साहेबा सारखे विरोधी पक्षनेते असताना सुद्धा विधान भवनाचे महत्त्व व गरिमा आपण कमी होऊ दिली नाही. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्षांमध्ये आपला सुसंवाद होता. विधान भवनामध्ये पेपरवेट भिरकावणाऱ्या विदर्भविर जांबुवंतराव धोटे साहेब जेव्हा बिमार पडले त्यावेळी आपण स्वतः भेटून त्यांची वैद्यकीय व्यवस्था करून दिली हा आपल्या मनाचा मोठेपणा होता. एखादा आमदार, आमदार निवासात आजारी पडला तर आपण स्वतः जातीने भेट देऊन त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायचे आता तसे राहिलेले नाही. एका दिवसात चार चार वेळा विधानसभा, विधानपरिषद तहकूब करावी लागते. आज शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडतात आणि विधानसभा वेगळ्याच विषयावर गोंधळात सुरू राहते. मागचे अधिवेशन “औरंगजेबाची कबर” यामुळे गाजले आणि आता सुरू असलेले अधिवेशन “हिंदी” भाषेची सक्ती यावर गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपोआपच शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडेल हे सर्व राजकीय जांगडबुत्ता थांबविण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या!
खरंच नाईकसाहेब तुम्ही आलात तर हुजरेगिरी करणारे तुमच्या पुढे पुढे गर्दी करतील व आम्हास दूर ढकलून देतील. आम्हाला पश्चाताप होईल! एवढा मोठा लेख लिहून काय फायदा यासाठी नाईकसाहेब तुम्ही चुपचाप या शक्य असेल तर सुधाकरभाऊ नाईक साहेब यांना सुद्धा घेऊन या!
आपल्याला वरील सर्व भयानक परिस्थिती दिसेल ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी नाईकसाहेब तुम्ही जरूर परत या !
आपल्या प्रतीक्षेत आपला सेवक
जय..वसंत!
✍ याडीकार पंजाब चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक, सुंदल निवास कदम लेआउट श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ मोबाईल 📞नंबर 94 21 77 4372



