आषाढी यात्रेसाठी ५२०० विशेष एसटी बसेस; ग्रुप बुकिंगवर थेट गावातून पंढरपूरला बस सेवा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पोलीस न्यूज नेटवर्क । पंढरपूर
आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “यावर्षी राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवासी पंढरपुरात येतात. अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.” या प्रवासात देखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.
गतवर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ५ हजार विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्राकाळात सुमारे २१ लाख भाविक-प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत : एकादशीच्या दिवशी लाखो भाविक-प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.
सरनाईक यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम
यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.
चार तात्पुरती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हानिहाय बसेस
चंद्रभागा बसस्थानक: मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भीमा यात्रा स्थानक: देगाव, छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती प्रदेश
विठ्ठल कारखाना स्थानक: नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
पांडुरंग बसस्थानक: सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग