‘ती’ पुन्हा हादरली! सहा महिन्यांत दुसऱ्यांदा विनयभंग; ॲसिड हल्ला व जिवे मारण्याची धमकी
जामिनावर सुटलेल्या आरोपीने तरुणीला पुन्हा छळले; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सुनिल पगारे : पोलीस न्यूज नेटवर्क, सातपूर
सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग करण्यात आला असून, तिला ॲसिड हल्ला करण्याची आणि जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी, अवघ्या सहा महिन्यांतच संबंधित आरोपीविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी नाशिक शहरातील एका महाविद्यालयात बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती शिक्षणासोबतच परिसरातील एका अकाउंट क्लासला दुपारी ४ ते ७ या वेळेत जाते. यापूर्वी, दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी तिच्याच ओळखीच्या आणि क्लासमेट असलेल्या अली हसन नबी खान (वय १९, रा. सातपूर, नाशिक) याने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. त्या प्रकरणी तरुणीच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (गु. र. नं. ३३९/२०२४) दाखल केला होता. त्या प्रकरणात अलीला अटक होऊन तुरुंगात जावे लागले होते; मात्र तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
पीडितेने दिलेल्या नव्या फिर्यादीनुसार, दिनांक १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास, ती तिच्या क्लासवरून एकटी घरी जात असताना अली हसनने तिला पुन्हा अडवले. त्याने तिचा हात पकडला आणि “तू माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केलीस, त्यामुळे मला जेलला जावं लागलं,” असे म्हणत तिला चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याचबरोबर, “तुझ्यावर ॲसिड फेकेन” असे म्हणत त्याने पीडितेच्या मनात दहशत निर्माण केली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट घरी जाऊन हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती आपल्या पालकांसोबत सातपूर पोलीस ठाण्यात आली व तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अली हसन नबी खान विरोधात नव्याने भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.