
सोलापूर: छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील राजकीय वाकयुद्ध आता आणखीनच पेटले आहे. इम्तियाज जलील यांच्यावर संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर, जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे.
शनिवारी (आज) दुपारी सोलापूर येथे आल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा दावा करत म्हटले: “संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांना धमक्या दिल्या आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांना फोन करून ‘आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल करा, अन्यथा तुमच्या बदल्या करेन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी मला स्वतः सांगितले, ‘साहेब, आता आम्ही काय करावे, संजय शिरसाट आम्हाला धमकी देत आहेत.’ मी त्यांना सांगितले की, ‘त्यांच्याकडे सरकार आहे, तुम्ही त्रास घेऊ नका.’ त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे,” असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
आगामी निवडणुकीबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले की, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसोबत युती करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत स्थानिक नेत्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.