‘ड्रग्ज तस्करांनो सावधान! आता तुमची खैर नाही!’ सरकारने घेतला मोठा निर्णय
‘मोक्का’ लावणार, ड्रग्ज तस्करांना धडा शिकवणार! - मुख्यमंत्री फडणवी यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी
राज्यात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. “राज्यात ड्रग्जची तस्करी कदापि खपवून घेतली जाणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही देत, यापुढे ड्रग्ज तस्करांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची धडाकेबाज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारच्या या मोठ्या पावलामुळे राज्यातील ड्रग्ज तस्करांची पाळेमुळे खणून काढण्यास मदत होणार असून, त्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
विधान परिषदेत राज्यातील एमडी ड्रग्जच्या तस्करीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. एमडी ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ड्रग्जविरोधी कारवायांसाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, मोठ्या प्रकरणांसाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
‘टास्क फोर्स’चे काय झाले?
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात यासंदर्भात सवाल उपस्थित केला. “राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ड्रग्जचा विळखा पडत असून, आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे आणि तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या सर्वांवर मोक्का लावून कारवाई करणार का? ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो, त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का?” असा प्रश्न फुके यांनी विचारला. तसेच, “राज्यात ठिकठिकाणी ड्रग्ज आणि अमली पदार्थांची तस्करी होतेय. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी जी ‘टास्क फोर्स’ स्थापन केली होती, तिचे काय झाले?” असा सवालही फुके यांनी केला.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. “ड्रग्ज तस्करी संदर्भात मोक्का लावत येईल का, यावर आपण याच अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात बदल करून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
आंतरराज्यीय तस्करीवरही कारवाईचा इशारा
शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. “इतर राज्यांतूनही अमली पदार्थांची तस्करी होतेय. मध्यप्रदेश आणि गुजरातधून जळगावच्या मुक्ताईनगर येथे तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर अफू आणि गांजाची तस्करी होतेय,” याकडे खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. “काही राज्यांत सीमेवर भांगेला परवानगी आहे, पण आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील, तर त्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.