नाशिकमधून खळबळजनक बातमी : ‘हनी ट्रॅप’मध्ये ७२ अधिकारी आणि मंत्री अडकल्याची शक्यता!

नाशिक | पोलीस न्यूज नेटवर्क
नाशिकमधून एक राज्यभर खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही केवळ हनी ट्रॅपची प्रकरणे आहेत की अधिकाऱ्यांच्या ‘रासलीला’ आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या एका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याने कोणीही अधिकारी किंवा नेता या ट्रॅपबद्दल उघडपणे समोर येण्यास तयार नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सध्या गुलदस्त्यात आहे.
नेमका कोणाचा सहभाग?
या प्रकरणामुळे नाशिकसह मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. एका बड्या नेत्याने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हनी ट्रॅपमध्ये नेमके कोणते अधिकारी किंवा मंत्री अडकले आहेत, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलीस आयुक्तांचे कानावर हात
इलेक्ट्रॉनिक माध्यमावर या संदर्भात एक बातमी करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र अशी कोणतीही तक्रार नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्याची माहिती माझ्याकडे नाही.
-संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक