फेरफार नोंद घेण्यासाठी 4 हजाराची लाच घेताना अंबडचा तलाठी जेरबंद

अंबड | पोलीस न्यूज नेटवर्क
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जालना युनिटने मोठी कारवाई करत एका तलाठ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी ६,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या या अधिकाऱ्याने तडजोडीअंती ४,००० रुपये स्वीकारले.
एका ३५ वर्षीय तक्रारदाराने अंबड शहरात एक रिकामा भूखंड खरेदी केला होता. या भूखंडाची त्यांच्या नावावर फेरफार नोंद करण्यासाठी अंबड सज्जा येथील तलाठी श्रीपाद दत्तात्रय देशपांडे (वय ५१) यांनी ६,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी १५ जुलै २०२५ रोजी जालना एसीबी युनिटकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने तक्रारदाराला पंचांसोबत श्रीपाद देशपांडे यांच्याकडे पाठवले. त्यावेळी देशपांडे यांनी ६,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, परंतु तडजोडीअंती त्यांनी ४,००० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
१५ जुलै २०२५ रोजी, मत्स्योदरी देवी मंदिराच्या सभामंडपाशेजारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४,००० रुपयांची लाच स्वीकारताच तलाठी श्रीपाद देशपांडे यांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली आहे.
आरोपी देशपांडे यांच्या अंगझडतीत एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, ४६० रुपये रोख आणि लाचेची जप्त केलेली ४,००० रुपये रोख रक्कम आढळून आली. त्यांचा मोबाईल पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला असून, त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
यांनी केली कारवाई
सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, ला.प्र.वि., जालना (मो. ९६८९०६६२८९)
सहाय्यक सापळा अधिकारी: पोलीस उपअधीक्षक बी.एस. जाधवर, ला.प्र.वि., जालना (मो. ९८८१४६३३६५)
पर्यवेक्षक अधिकारी: बी. एस. जाधवर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., जालना
मार्गदर्शक: श्री. संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नांदेड (प्रभारी, ला.प्र.वि., छत्रपती संभाजीनगर)
मार्गदर्शक: श्री. सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., छत्रपती संभाजीनगर (मो. ९९२३२४७९८६)
सापळा पथक: पोहेकॉ श्रीनिवास गुडूर, गणेश चेके, शिवलिंग खुळे (ला.प्र.वि., जालना), चालक पोहेकॉ बिनोरकर
जनतेला आवाहन:
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक: १०६४
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., छत्रपती संभाजीनगर: मो. ९०११०९२७७७
उपअधीक्षक, ला.प्र.वि., जालना: मो. ९८८१४६३३६५ / ९४२१३२१४०६