क्रीडादेश-विदेश

आता तरी ‘चोकर्स’ म्हणू नका हो… जिंकल्यावर मार्करम झाला भावूक, बावुमानं सांगितलं- ‘कंगारूंनी कसं हिणवलं होतं’

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या तिसऱ्या टप्प्याच्या (2023-25) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी खेळाच्या चौथ्याच पूर्ण केले. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडने पहिल्या टप्प्यात आणि ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टप्प्याचे विजेतेपद पटकावले होते.

या विजेतेपदासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्वतःवरील ‘चोकर्स’चा शिक्काही काढून टाकला आहे. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये हरण्याच्या सवयीमुळे चाहते खूप काळापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ‘चोकर्स’ या नावाने ट्रोल करत होते. इतकेच काय, तर WTC फायनलदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाचे खेळाडूही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना चिडवत होते.

चौथ्या दिवशी जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त ६९ धावा हव्या होत्या आणि त्यांचे ८ गडी शिल्लक होते, तेव्हाही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वाटत होते की ते त्यांना सर्वबाद करू शकतात. कर्णधार टेम्बा बावुमा यांनी खुलासा केला आहे की, फायनलच्या चौथ्या दिवशी (१४ जून) ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी त्यांना चिडवण्यासाठी ‘चोक’ (choke) या शब्दाचा वापर केला.

टेम्बा बावुमा यांनी बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलला सांगितले, “आज सकाळी पुन्हा आमच्यावर ‘चोकर्स’चा ठपका लावण्यात आला. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ‘चोक’ हा शब्द वापरताना ऐकले. त्यांच्या एका खेळाडूने सांगितले की आम्ही अजूनही सर्वबाद होऊ शकतो. मी ते बोलणे नक्कीच ऐकले होते.”

मार्करमचे भावूक करणारे विधान

‘सामनावीर’ एडन मार्करम यांना आशा आहे की ‘चोकर्स’ या शब्दाचा प्रयोग आता दक्षिण आफ्रिकेसाठी कधीही केला जाणार नाही. एडन मार्करम यांनी सामन्यानंतर सांगितले, “हा शब्द (चोक) पुन्हा कधीच ऐकायला मिळू नये, हे चांगले होईल. यावेळेस आम्ही काम पूर्ण केले आणि त्या टॅगपासून सुटका मिळवली, ही आमच्या संघासाठी मोठी गोष्ट आहे.”

दक्षिण आफ्रिकेचा संघ २७ वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. यापूर्वी त्यांनी आपले पहिले आयसीसी विजेतेपद १९९८ साली (विल्स इंटरनॅशनल कप) जिंकले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या WTC फायनलच्या विजयात एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांची महत्त्वाची भूमिका होती. मार्करम यांनी धावसंख्येचा पाठलाग करताना १३६ आणि बावुमाने ६६ धावा केल्या. दोघांमध्ये तिसऱ्या गड्यासाठी १४७ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे वळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker