भीषण अपघात: ट्रकने दुचाकीला उडवले, माय-लेकी ठार; वडील आणि चिमुकली जखमी
अंबड तालुक्यातील जामखेड फाट्याजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर हृदयद्रावक घटना

अंबड/प्रतिनिधी (अकबर शेख):
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (MH 52) वर शुक्रवार, २० जून २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अंबड तालुक्यातील जामखेड फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात पत्नी आणि मोठी मुलगी जागीच ठार झाल्या, तर पती आणि त्यांची लहान मुलगी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वकांत शिंदे (वय ३५) हे आपल्या मोटरसायकलवरून (MH 21 BW 1850) पत्नी शीला विश्वकांत शिंदे (वय ३५), मोठी मुलगी परी विश्वकांत शिंदे (वय ०४) आणि लहान मुलगी (वय ०१) यांच्यासह बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक KA56-4201 च्या चालकाने अत्यंत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने ट्रक चालवत त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोटरसायकलवरील शीला विश्वकांत शिंदे आणि परी विश्वकांत शिंदे या दोघी ट्रकच्या चाकाखाली आल्या. मुलगी परी हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई शीला यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राणज्योत मालवली. मोटरसायकल चालक विश्वकांत शिंदे आणि त्यांची सर्वात लहान मुलगी यांना किरकोळ मार लागला आहे.
अपघातानंतर तातडीने आयआरबीच्या रुग्णवाहिकेने जखमी व मृतांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त मोटरसायकल बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघातात मदतकार्य
सदर अपघातात प्रभारी अधिकारी आर. के. निकम यांच्यासह एएसआय राम चव्हाण, हेड कॉन्स्टेबल जी. डी. गोल्डे (महामार्ग पोलीस केंद्र, जालना), पोलीस स्टेशन अंबड येथील हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, तसेच आयआरबीचे डॉ. विजय धारकर, रवी गाडेकर, आत्माराम गाडेकर (रुग्णवाहिका चालक), आयआरबीचे पेट्रोलिंग कर्मचारी विकास जाधव, शिवचरण जाधव, चंद्रशेखर, बबन लोंढे आणि अभिषेक शिरसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी जखमी व मृतांना तात्काळ रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात पाठवून मदत केली आणि अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.