क्राइम

गोदापात्रातून ३०० ब्रास वाळूचे अवैध उत्खनन: २६ जणांवर गुन्हे दाखल, शासनाचा १० लाखांचा महसूल बुडाला

अकबर शेख, अंबड प्रतिनिधी:

अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीपात्रातून तब्बल १० लाख रुपये किमतीची ३०० ब्रास वाळू अवैधरीत्या उपसा करून वाहतूक केल्याप्रकरणी २६ वाळू माफियांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शासनाचा अंदाजे १० लाखांचा महसूल बुडाला आहे.

या प्रकरणी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या आदेशानुसार शहागड गावातील जुना पूल, महादेव मंदिराजवळ आणि पाणीपुरवठा विहिरीजवळ नदीपात्राची पाहणी करण्यात आली. या पाहणीत तीन ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन करून तिची वाहतूक केल्याचे आढळून आले. महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मंडळ अधिकारी नारायण बामणावत यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८(७), ४८(८) तसेच गौण खनिज प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ अन्वये ही फिर्याद नारायण धनसिंग बामणावत (५४, मंडळ अधिकारी, शहागड) यांनी दिली आहे.

या फिर्यादीनुसार, शाहरुख शहा, संदीप थात्रे, जुनेद तांबोळी, योगेश परदेशी, इरफान तांबोळी, अमर बागवान, इद्रीस शहा, दत्तात्रेय ढगे, नितीन परदेशी, अयाज बागवान, चंद्रकांत लव्हाळे, सचिन परदेशी, मुक्तार शहा, नवीद तांबोळी, गणेश कुकरे, समिदीन शेख, अजय निकाळजे, भैय्या येटाळे, गणेश उमरे, संजय लक्ष्मण रॉटेवाड, लखन परदेशी, प्रदीप थोत्रे, अजय परदेशी, बाबासाहेब येटाळे, संजय उंबरे, आणि अविनाश हारेर (सर्व रा. शहागड, ता. अंबड) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक किरण हावळे हे करत आहेत.

या प्रकरणी उपनिरीक्षक किरण हावळे यांनी संबंधित वाळू तस्करांच्या घरी शोधमोहीम घेतली, परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाले. या शोधमोहिमेसाठी आरसीबी प्लाटूनचे १५ कर्मचारी, ज्यात महिला पोलिसांचाही समावेश होता, सहभागी झाले होते.

या प्रकरणाच्या सुरुवातीला तहसीलदार कार्यालयाने नोटिसा काढल्या होत्या. त्यांच्या सुनावणीदरम्यान काही नावे वगळण्यात आल्याने “खरी कोणती आणि खोटी कोणती नावे वगळण्यात आली?” यावरून वाळू तस्करांमध्ये चर्चेला उधाण आले होते. नावे वगळण्यासाठी काही आर्थिक देवाण-घेवाण झाली का, अशी कुजबूजही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker