जालन्यात पोस्टाने तलवारी मागवण्याच्या प्रकारात वाढ; दोन तलवारी जप्त
पोस्टाद्वारे मागवलेल्या दोन तलवारी डीवायएसपी पथकाकडून जप्त; विधीसंघर्ष बालकासह तरुण ताब्यात

जालना | पोलीस न्यूज नेटवर्क
जालना शहरात पोस्टाद्वारे तलवारी मागवण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. विविध गुन्ह्यांतील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या पथकाने आज (दि. 3) पोस्ट ऑफिस परिसरात सापळा रचून दोन तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
जालना उपविभागात विविध गुन्ह्यांत हवे असलेल्या आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी डीवायएसपींचे विशेष पथक शहरात गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार सागर खैरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती पोस्टाने आलेली तलवार घेण्यासाठी मोटारसायकलवरून पोस्ट ऑफिसमध्ये येणार आहे.
ही माहिती मिळताच पथकाने डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांना याची कल्पना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट ऑफिस परिसरात सापळा लावला. काही वेळाने एका तरुणासह एक विधीसंघर्ष बालक पोस्टातून खाकी रंगाचा बॉक्स घेऊन जाताना दिसले. पथकाने तत्काळ दोघांना अडवून त्यांची चौकशी केली.
मुख्य आरोपीने आपले नाव रेहान शेख सलीम (वय १८, रा. रामनगर, पोलीस कॉलनी) असल्याचे सांगितले. त्याने आपल्याकडील बॉक्समध्ये तलवार असल्याची कबुली दिली. तसेच, आपल्या घरीसुद्धा आणखी एक तलवार असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही तलवारी जप्त केल्या असून रेहान याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सदर बाजार डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, डीवायएसपी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, तसेच पोलीस हवालदार रामप्रसाद रंगे, पोलीस अंमलदार परमेश्वर धुमाळ, सागर खैरे, दुर्गेश गोफणे, विशाल काळे आणि इम्रान खान यांचा समावेश होता.





