
धाराशिव: प्रेमसंबंध आणि लग्नासाठी धमकावून सोशल मीडियावर बदनामी करण्याची, तसेच बंदुकीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तुळजापूर येथे एका १५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सारिका बिजली शिकारे (वय १५) असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी ओंकार कांबळे आणि नगीना शशिकांत पांडागळे या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी ओंकार कांबळे हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे, तसेच बंदूक खरेदी-विक्री आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार सारिकाला ‘माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करेन’ अशी धमकी देत होता. ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुला बंदुकीने गोळी घालीन’ असेही त्याने धमकावले होते. या सततच्या त्रासाला कंटाळून सारिका शिकारे हिने टोकाचे पाऊल उचलले.
मुलीच्या आत्महत्येनंतर खचलेल्या आई, बिजली मधुकर शिकारे (वय ३५) यांनी १० जून २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी ओंकार कांबळे आणि नगीना पांडागळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१(३) (धमकी देणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.