शहागड येथे मटका बुकीला अटक; मालक फरार

अंबड प्रतिनिधी: गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहागड (ता. अंबड) येथे मटका बुकींविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत बुधवारी एका मटका बुकीला अटक करण्यात आली असून, मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहागड बसस्थानक परिसरात एक व्यक्ती मटका घेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, जमादार रामदास केंद्रे आणि फुलचंद हजारे यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. यावेळी अशोक गोपीनाथ परदेशी हा मटका चालवताना रंगेहाथ पकडला गेला.
पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल, रोख ₹२,०५०/- आणि मटक्याच्या चिठ्ठ्या असा एकूण ₹१२,०५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी जमादार फुलचंद हजारे यांच्या फिर्यादीवरून अशोक गोपीनाथ परदेशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार रामदास केंद्रे हे करत आहेत. फरार झालेल्या मुख्य सूत्रधाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.