पंढरपूर : व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू !
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; व्हीआयपीच्या नावाखाली सुरू असलेल्या काळाबाजारावर अंकुश

पोलीस न्यूज नेटवर्क । पंढरपूर
श्री विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या काळाबाजारावर आणि मंदिर परिसरात व्हीआयपी वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीवर अंकुश लावण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. व्हीआयपी गेटजवळ पोलीस, अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री आपल्या लवाजम्यासह आणि गाड्यांच्या ताफ्यासह येत असल्याने दर्शन व्यवस्थेत गोंधळ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, आता चौफाळा ते महाद्वार (मंदिर परिसर) या परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू करण्यात येणार आहे. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या मंत्रीमहोदय आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना राजशिष्टाचारानुसार शिवाजी चौक येथून मंदिर येथे घेऊन जाण्यासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यामुळे भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही आणि त्यांना सुखकर दर्शन घेता येईल. यासोबतच, व्हीआयपी दर्शनावरही कडक निर्बंध लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाला दिले आहेत.
0
व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध लागू करा!
विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेहमीच व्हीआयपी लोकांची वर्दळ असते. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. म्हणून मंत्र्यांनी विठ्ठलाच्या दर्शनाबाबतची आचारसंहिता पाळावी. अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आपत्कालीन परिस्थितीत मंदिर परिसरात ॲम्बुलन्स, अग्निशमन या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या अनुषंगाने चौफाळा ते महाद्वार (मंदिर परिसर) या परिसरात नो व्हेईकल झोन करावा. तसेच, दर्शनाला येणारे मंत्रीमहोदय राजशिष्टाचार प्रमाणे अति महत्त्वाच्या व्यक्तींना शिवाजी चौक येथून मंदिर येथे घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा. यासाठी मंदिर समितीने नव्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत, जेणेकरून भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही आणि त्यांना सुखकर दर्शन घेता येईल. त्याचबरोबर व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध लागू करावेत.
— कुमार आशीर्वाद, (जिल्हाधिकारी सोलापूर)
0
जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन!
व्हीआयपी दर्शन बंद झालेच पाहिजे. सेवक वर्गाला सोडून दुसऱ्या कोणत्याही लोकांना मंदिरात प्रवेश दिला नाही पाहिजे. व्हीआयपी लोकांच्या मंदिर परिसरात गाड्यांची वर्दळ झाल्यामुळे भाविकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे व्हीआयपी गाड्या मंदिर परिसरात सोडणे बंद केले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध लागू केले आहेत व आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
— आचार्य जोगदंड महाराज, (श्री क्षेत्र पंढरपूर)
0
कायदेशीर कारवाई करणार!
विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेत भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांची व्हीआयपी गेटजवळ मोठी गर्दी होत असते. यामुळे प्रशासन व मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत. आज जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचे तंतोतंत पालन करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
— विश्वजीत घोडके, (शहर पोलीस निरीक्षक, पंढरपूर)