अंबड शहरात ट्रक-दुचाकी अपघातात आजी-नातू ठार

अकबर शेख
अंबड प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सोमवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे पाच वाजता पाचोड रोडवर मालवाहू ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील आजी आणि नातू ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाले. गोपीका रामभाऊ वाघ (वय ५०, रा. दावलवाडी ता. पैठण) व विशाल कृष्णा पवार (वय दीड वर्ष) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आजी-नातवांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दावलवाडी येथून कुटुंबातील सदस्य दुचाकींवरून अंबड तालुक्यातील दुधपुरी येथे वर्षश्राद्धासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते अंबडमार्गे पुन्हा दावलवाडीला परतत असताना अंबड शहरातील पाचोड रोडवर ट्रक (क्र. एमएच १२ ईएफ ९९३१) व दुचाकी (क्र. एमएच २० डीएस ३७५६) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली.
यात आजी व नातू ट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या शरीराचे अक्षरशः चेंदामेंदा झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एका रॉग साईडने आलेल्या रिक्षामुळे ट्रक चालकाने अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गुरले, हेड कॉन्स्टेबल फलटणकर हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपाणीकरिता अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षश्राद्धाच्या दिवशीच पुत्रही गमावला…
या अपघातातील मृतक विशाल कृष्णा पवार याचे वडील दिवंगत असून मंगळवारी (दि.८ जुलै) त्यांचे वर्षश्राद्ध होते. दुर्दैवाने, त्याच दिवशी त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी योगायोगामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.