क्राइममहाराष्ट्र

विठ्ठल मंदिरात शिवसेनेचे मंत्री गोगावलेंच्या कार्यकर्त्यांचा राडा, कर्मचाऱ्यांना केले रक्तबंबाळ

दर्शनाच्या वादातून धक्काबुक्की, कर्मचाऱ्याच्या जखमी अवस्थेने भाविक हादरले; माफीनाम्यावर प्रकरण दाबल्याचा आरोप, कठोर कारवाईची मागणी

राजरतन बाबर । पंढरपूर
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत विठ्ठल मंदिरात आलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या गोंधळात मंदिरातील एक कर्मचारी रक्तबंबाळ झाला. घडलेला प्रकार दडपण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने केवळ माफीनाम्यावर सारवासारव केल्याची चर्चा आहे.
मंदिरात झालेल्या गोंधळाची सखोल चौकशी करून मंदिर समितीने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी आणि भाविकांकडून जोर धरू लागली आहे.
मंत्री गोगावले बुधवारी सकाळी विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आले असताना, त्यांच्या समोरच हा गोंधळाचा प्रकार घडला. यामुळे भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाही, मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी धक्काबुक्की करत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली. या घटनेत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला, तरीही बराच वेळ गोंधळ सुरू होता.
अलीकडच्या काळात सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून मंदिरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मंदिरातील अधिकाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलीस कारवाई करावी, अशी मागणी मंदिरातील कर्मचारी व भाविकांकडून केली जात आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले दर्शनासाठी आले असताना, त्यांच्यासोबत आलेल्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली.
माफीनाम्यानंतर प्रकरण दडपल्याचा आरोप : या प्रकारानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरण चवरे यांनी मंदिर समितीला घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा दिला आहे. या माफीनाम्यावरच अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपल्याची चर्चा सुरु झाली आहे. मंत्री भरत गोगावले मंदिरात दर्शनासाठी आले असता, मंदिरातील कर्मचाऱ्यांबरोबर “समज-गैरसमजातून जे काही घडले, ते चुकून घडले आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा माझ्याकडून काही चुकीचे घडले असल्यास, आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो,” असा माफीनामा मंदिर समितीला देण्यात आला आहे. यानंतर मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0
कर्मचाऱ्यांनी केली कठोर कारवाईची मागणी
अलीकडच्या काळात सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून मंदिरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मंदिरातील अधिकाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलीस कारवाई करावी, अशी मागणी मंदिरातील कर्मचारी व भाविकांमधून पुन्हा एकदा केली जात आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले दर्शनासाठी आले असताना, त्यांच्यासोबत आलेल्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील कर्मचारी व अधिकार्यांना धक्काबुक्की देखील केली.
राजेंद्र शेळके, (कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker