
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संभाव्य युतीबद्दलच्या चर्चेचे घोंगडे भिजत असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सूचक विधान केले. “महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, ते होईल,” असे म्हणत त्यांनी राजकारणातील ठाकरे ब्रँड एकत्र येण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याचे स्पष्ट केले.
या युतीबाबतचे बारकावे तपासले जात असून, “तुम्हाला थेट बातमीच देऊ,” असे ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगत युतीबाबतची चाचपणी सुरू असल्याचे संकेत दिले. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नाकारली नव्हती. याला उद्धव ठाकरे यांनी आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेल्यामुळे ही चर्चा पुढे सरकली नव्हती. त्यानंतरही दोन्ही नेत्यांनी यावर जाहीरपणे बोलणे टाळले होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र या युतीबाबत दोन्ही नेते चर्चा करत असतील, असे मोघम उत्तर देत टोलवाटोलवी केली होती. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी यावर मौन सोडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मनसेमधील युतीच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.
“मी तुम्हाला थेट बातमी देईन”:
आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितले. याबाबत जे काही बारकावे आहेत, ते आम्ही पाहत आहोत. तसेच, मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यामुळे माझे म्हणणे असे आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ.”
राजकीय समीकरणांत बदल?
जर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र आले, तर महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावर हे मोठं समीकरण ठरू शकतं. विशेषतः भाजप आणि महायुतीच्या विरोधात एकत्र आलेली ही ताकद मराठी मतदारांवर प्रभाव टाकण्याची ताकद बाळगते. त्यामुळे पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती एक निर्णायक भूमिका बजावू शकते.
राजकारणातले भावनिक वळण
राज आणि उद्धव ठाकरे – हे नात्याने चुलत भाऊ. पण शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर गेल्या दोन दशकांमध्ये त्यांच्यात मोठं अंतर पडलं. अनेकदा युतीच्या चर्चा झाल्या, पण त्या फक्त चर्चाच राहिल्या. आता मात्र दोन्ही बाजूंकडून सकारात्मक भूमिका दिसत असल्याने, जनतेला ही युती प्रत्यक्षात उतरल्याचं पाहायला मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.